Monday, 19 December 2016

Christian Gospel - प्रभू येशू ख्रिस्ताचा पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्मांस येण्याचा प्राथमिक उद्देश - Primary purpose of Jesus Christ to be born as human on Earth

प्रभू येशू ख्रिस्ताचा पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्मांस येण्याचा प्राथमिक उद्देश - Primary purpose of Jesus Christ to be born as human on Earth



पार्श्वभूमी: आजच्या ख्रिस्ती जगतात व इतर धर्मियांकडूनही दरवर्षी नाताळ सण 'Christmasहा मोठ्या धामधुमीने साजरा केला जातो. का तर प्रभू येशू ख्रिस्तजो देवाचा पुत्र हा त्या दिवशी या भूतलावर जन्मांस आला आणि म्हणून सगळे लोक आनंद साजरा करत असतात. त्या काळात येणाऱ्या  'Santa-Claus'चे आकर्षणाने तर संपूर्ण जगाला वेडे करून ठेवले आहे. ह्या सर्व सणाच्या व उत्सवाच्या कल्लोळा पाठीमागे, दबक्या आवाजात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे "येशू ख्रिस्त पृथीवर कशासाठी आला ?" किंवा "येशूचे पृथीवर येण्यामागचे मुख्य कारण काय आहे?" ख्रिसमसचा उत्सव साजरा करणाऱ्या लोकांतील बहुतांश लोकांना ह्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही, हा एक मोठा विरोधाभास व शोकांतिका आहे. खरंच का सर्वसमर्थजो स्वर्गात सर्व गौरवात व महिमेत वास करणाऱ्या परमेश्वर देवाला, या भूतलावर मनुष्य म्हणून जन्मास येण्याची गरज का भासाली ? हा प्रश्न सर्व सामान्य मनुष्याच्या मनात येणे साहजिक आहे. ह्या ब्लॉग पोस्टद्वारे आपण येशू ख्रिस्ताचा पृथीवर येण्याचे प्राथमिक व मुख्य कारणांचा शोध घेऊ या.

प्रभू येशू ख्रिस्ताचे या भूतलावर मनुष्य बनून येण्याचे अनेक उद्देश होते. परंतु त्यात त्याच्या  येण्याचा प्राथमिक आणि मुख्य उद्देश म्हणजे पृथीवरील मनुष्यांना त्यांच्या पापांपासून मुक्त करून त्यांच्या तारणाद्वारे सार्वकालिक जीवन बहाल करणे.' खरे पहिले असता पापी मनुष्यांना तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः तारणारा”/ “मुक्तीदाता  (Saviour) म्हणून या भूतलावर अवतरला व मनुष्यांचे सर्व पाप स्वतःवर घेऊन त्याने वधस्तंभावर आपला प्राण अर्पण केला; तेणेकरून त्याने सर्व मनुष्यांना पापाच्या बंधनांतून मुक्त केले आणि सार्वकालिक जीवनासाठी पात्र ठरविले. .'

येथे लगेच दुसरा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे "मनुष्यांना तारणाऱ्याची गरज लागतेच कशाला तसेच मनुष्याने कशापासून तारण हवे होते ?

तर पापांत पतन पावलेल्या मनुष्यांना त्यांच्या पापांपासून तारण पावण्याची गरज होती आणि आहे. ते स्वतः आपल्या पापांपासून तारण मिळवू शकत नव्हते; त्यासाठी त्यांना एका तारणाऱ्याची गरज होती. 

आता कोणीही मनुष्य म्हणेल कि पाप केलेच नाही त्यामुळे मला पापमुक्ती आणि पर्यायाने तारणाची गरजच नाही. ह्यावर शास्त्र आपल्याला काय सांगते ते आपण पाहू या. 

ह्या जगातील सर्व मनुष्य हे पापी आहेत

ह्या जगात जन्मलेला प्रत्येक मनुष्य हा पापांत जन्मलेला आहे व दररोज त्याच्याकडून अनेक असे पापे घडत असतात.  (रोमकरांस पत्र ३:२३ वाचाप्रेषित योहान पण आपल्या पत्रात ह्याला दुजोरा देतो (१ योहान १:८१० वाचा) त्याचबरोबर जरी कोणी मनुष्यांनी जरी प्रत्येक्षात पाप केलेले नसलेतरी ते त्यात आढळतेकारण ते पाप मनुष्यांत वरश्याने आलेम्हणजेच आदाम व हव्वा ह्यांचे पाप त्यांच्यातून आजवर सर्व मानवजातीत चालून आले आहे. (रोमकरांस पत्र ५:१२ वाचा)

रोमकरांस पत्र ३:२३-२४
"कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेतदेवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात."

१ योहान १:८१०
"आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलोतर आपण स्वतःला फसवितोव आपल्या ठायी सत्य नाही..... आपण पाप केले नाहीअसे जर आपण म्हटलेतर आपण त्याला लबाड ठरवितो,  आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. "

रोमकरांस पत्र ५:१२
"एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरलेआणि सर्वानी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”

तसेच कोणीही पापी मनुष्याला तारण / सार्वकालिक जीवन / मोक्ष / स्वर्गात प्रवेश मिळू शकत नाहीकारण शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की पापाचे वेतन/ शेवट हे मरण आहे.  (रोमकरांस पत्र ६:२३ वाचा)

रोमकरांस पत्र ६:२३
"कारण पापाचे वेतन मरण आहेपण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे."

मग मनुष्यांत पापाची सुरवात कुठून व कशी झाली आणि त्याचे देवाबरोबर असलेले नाते कसे तुटले गेले, हे आपण प्रथम पाहू या.


देव आणि मनुष्य ह्यांचे तुटलेले संबंध

उत्पतीत देवाने पृथ्वीवर सर्व सृष्ट वस्तूंबरोबर मनुष्यांना देखील निर्माण केले. ते आदम आणि हव्वा हे होतेआणि ते देवाच्या प्रतीरूपाचे असे होते. देवाने त्यांना एदेन बागेत ठेवले आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टींवर सत्ताधारी असे नेमिले. देव रोज शिळोप्याच्या वाऱ्याच्या वेळी म्हणजे संध्याकाळी त्यांची भेट घेत असे. त्यावेळी देव आणि मनुष्यांमध्ये थेट संवाद होत असे, कारण ते तिघेही पवित्र असे होते. 

परंतु  कालांतराने सैतानाने हव्वेला भुलवूनमनुष्याकडून पाप (देवाचा आज्ञाभंग) घडविलेतेव्हा ते दोघे भ्रष्ट होऊन पापात पडलेह्या पापामुळे देवाचे आणि मनुष्यांचे सबंध तुटले गेलेकारण देव पवित्र होता आणि मनुष्य पापी झाला होता; आणि पवित्र आणि अपवित्र (पापी) ह्यांचा मिलाप कसा होणार जसा उजेड आणि अंधार ह्यांचा मिलाप होणे शक्य नाहीतसे तेहि होणे शक्य नाही. ह्यामुळे देव आणि मनुष्य ह्यांमधे मोठी भिंत उभारली गेली. मनुष्य एदेन बागेतून बाहेर फेकला गेला. त्यावेळेपासून देव आणि मनुष्य ह्यांचे जे सबंध कायमचे तुटले गेले. 

त्यांच्या ह्या पापामुळेएदेन बागेपासून त्यांच्यातून आजवर सर्व मनुष्य जातीत पसरल्या गेल्यामुळेआजही मनुष्य देवाशी थेट संबंध साधू शकत नाही. जोपर्यंत मनुष्यांना पापांची क्षमा होत नाहीतो पर्यंत तो देवासमोर येऊ शकत नव्हता किंवा त्याच्याशी सह्भागीता करू शकत नव्हतायशया संदेष्ठाहि आपल्याला हेच सांगतो किमनुष्यांची पापे ही त्याच्या आणि देवांमध्ये आढभिंती प्रमाणे झाले आहेत. (यशया ५९:२ वाचा)

यशया ५९:२
"तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेततुमच्या पातकांमुळे तो तुम्हांला दर्शन देत नाही."

ह्या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचा "मूळ पाप' Original  Sin हा ब्लॉग वाचा.


देवाने मोशेद्वारे स्थापलेल्या जुन्या कराराच्या नियामशास्त्राप्रमाणे, तात्पुरता पर्याय म्हणून पापार्पणाचा विधी लावून दिला होतात्याप्रमाणे मुख्य याजक हा वर्षातून एकदा लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित म्हणून कोकऱ्याचे/बकऱ्याची रक्त घेऊन परम पवित्र स्थनात (म्हणजेच देवापुढे) जाऊन मध्यस्थी करत असत. (लेवीय ४ अध्याय पापार्पणे वाचापण तेथे मुख्य याजकाला पापक्षमा करण्याचा अधिकार नव्हतातो फक्त एक मध्यस्थाचे काम करत असेमहत्वाचे म्हणजे त्या अर्पणाने (कोकऱ्याचे/बकऱ्याची रक्त) मनुष्यांची पापे केवळ झाकली जात होतीकायम पुसली जात नव्हती कारण त्या कोंकऱ्याच्या रक्तात मनुष्याचे पाप संपूर्णपणे पुसण्याचे समर्थ नव्हते. त्यामुळे ते पाप तसेच रहायचे (पण झाकलेले). आणि पाप संपूर्णपणे धुतले जात नसल्यामुळेमनुष्यांचा देवाशी थेट संवाद होऊ शकत नव्हता.

परंतू देवाची मनुष्यांवर होती व फार प्रीती आहे. त्याला मनुष्यांच्या त्या हतबल स्थिथीची फार कीव आली. तेव्हा त्याने मनुष्यांबरोबर तुटलेल्या सबंध खऱ्या अर्थाने पुन्हा स्थापण्यासाठी एक महान मुक्तीची संकल्पना आखली. त्याने त्याचा (देवाचा) आणि मनुष्य ह्यांचा समेट घडवून आणण्याचा एक महान संकल्प आखला. तो संकल्प म्हणजे मनुष्यांची त्यांच्या पापांपासून मुक्ती!!!!
(इफिसकरांस पत्र २:१३-१६ वाचा)

इफिसकरांस पत्र  २:१३-१६

परंतु जे तुम्ही पूर्वी 'दूरहोता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या रक्ताच्या योगे 'जवळचेझाला आहा. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहेत्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पडलीत्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्रह्यासाठी कीस्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावीआणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्यांच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा ; ....कारण त्याच्याद्वारे (म्हणजे येशूच्या) आत्म्याच्या योगे आपणां उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. "

ह्या संकल्पनेत त्याने जुना करार (जो मनुष्याचे पाप संपूर्णपणे पुसू शकत नव्हतारद्द करूनमनुष्यांबरोबर एक नवा करार स्थापन केला. (इब्री लोकांस पत्र १०:१-१८) आणि तो स्थापण्यासाठी तो स्वतः मनुष्य रूप धारण करून तो पृथ्वीवर अवतरला. म्हणजेच त्याने स्वत: मनुष्यांच्या रुपात पृथ्वीवर जन्म घेऊन आपले बलिदान करून व आपल्या त्या निर्दोष रक्ताने मनुष्यांच्या पापांसाठी एकदाचेच प्रायश्चित करावेजेणेकरून त्यांचे देवाबरोबर समेट करून त्या उभयंतांमध्ये पूर्वी तुटलेले सबंध पुन्हा प्रस्थापित करावे व मनुष्यांसाठी तारणाचा / मोक्षाचा मार्ग पुन्हा उघडावा.

ह्याप्रमाणे तो महान परमेश्वर ह्या भूतलावर 'मनुष्याचा पुत्र' म्हणून मरीयेच्या पोटी ‘येशु म्हणून जन्मी आला आणि त्याच्या प्रायश्चिताच्या त्या निर्दोष रक्ताने खंडणी भरून त्याने मनुष्यांना देवाबरोबर जोडले.

गब्रीएल देवदूताने मरियेला आपल्या संदेशात हेच सांगितले होते. (मत्तय १:२१ वाचा)

मत्तय १:२१
"... आणि त्याचे नाव तू येशू ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. "

ह्याचा अर्थ असा आहे कीमनुष्यांना पापांपासून मुक्त करण्यासाठी तो स्वत: निर्दोष कोकरा बनून आला आणि आपल्याला स्वतःला (म्हणजेच त्याचे रक्त) त्याने प्रायश्चित म्हणून अर्पण केले. त्याच्या त्या अर्पणाने त्यांना देव आणि मनुष्य ह्या दोघांमध्ये समेट घडवून आणला.  (रोमकरांस पत्र ५:६-११ वाचा)

रोमकरांस पत्र ५: ८-१०
परंतु देव आपणांवरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो कीआपण पापी असतानाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेषकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहो. कारण आपण शत्रू असतां देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या (म्हणजे येशूच्या) मृत्यूद्वारे आपला समेट झालातर आता समेट झालेला असतां त्याच्या जीवनाने आपण विशेषकरून तारले जाणार आहो; "

ह्याकारणामुळे देव आणि मनुष्य ह्यांमधे प्रभू येशु हा एकच मध्यस्थ आणि मुख्य याजक असा झाला.  (१ तीमिथ्याला पत्र २: ५, इब्री लोकांस पत्र ४ :१४, ७: २४-२५ वाचा)

त्याच्या ह्या अर्पणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मनुष्याला त्याने पापक्षमा (आणि पर्यायाने नीतिमत्व) फुकट देऊ केले.

इब्री लोकांस पत्र ४ :१४
"तर मग आकाशांतून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे;"

इब्री लोकांस पत्र ७: २४-२५
पण हा 'युगानुयुगराहणारा असल्यामुळे ह्यांचे याजकपण अढळ आहे. ह्यांमुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्याना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहेकारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा (येशू ख्रिस्तसर्वदा जिवंत आहे .”

१ तीमिथ्याला पत्र २ : ५
कारण एकच देव आहेआणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशु हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे".

ह्या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचा “पापक्षमा: केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच मिळते” हा ब्लॉग वाचा.

ह्याप्रमाणे केवळ प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अर्पणद्वारे मनुष्यांना त्यांच्या पापांपासून मुक्त केले व त्यांचा देवाशी समेट करून त्यांच्यासाठी तारणाचा मार्ग पुन्हा मोकळा केला. ह्याच कारणामुळे त्याला मनुष्यांसाठी एकमेव 'तारणारा' (Saviour) म्हणून गाण्यात आले.


सारांश:  उत्पत्तीत घडलेल्या पापामुळे संपूर्ण मनुष्यजात ही पापांत पडली गेली व त्यांचा देवाबरोबरचा थेट संबंध तुटल्यामुळे ते सर्व मरणांत ढकलेले गेले. ह्या परीस्थितीत मनुष्यांना तारणाची कोणतीही आशा नव्हती. तेव्हा परमेश्वर देवाला मनुष्याची दया येऊन त्याने मनुष्यांच्या तारणाची/मुक्तीची एक महान संकल्पना आखली.

ह्याच मुक्तीच्या संकल्पनेप्रमाणे तो परमेश्वर देव स्वतः 'मनुष्याचा पुत्र' म्हणून मरीयेच्या पोटी ‘येशु’ म्हणून जन्मी आला आणि त्याच्या प्रायश्चिताच्या त्या निर्दोष रक्ताने खंडणी भरून त्याने मनुष्यांना देवाबरोबर समेट करून व जोडून त्या सर्वांसाठी तारणाचा मार्ग मोकळा केला. ह्यामुळे तो अखिल मनुष्य जातीचा तारणारा’ (Saviour) म्हणून गणला गेला. हाच त्या परमेश्वर देवाचा पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्मण्याचा मुख्य उद्देश होता. आमेन.





सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्रबायबल सोसायटी ऑफ इंडियाह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.



Contact Details / संपर्क माहिती 

ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:

Email : digitalsuvartik.vasai@gmail.com

Mob: 8850752437

Digital सुवार्तिक 
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक  All Rights Reserved

                             
                                       

No comments:

Post a Comment

Search Digital सुवार्तिक