एक देव की पवित्र त्रियेक ? "One God or Holy
Trinity?”
पार्श्वभूमी: आजच्या संपूर्ण जगतातील ख्रिस्ती लोकांना एक
मोठा गहन प्रश्न सातवीत आहे; तो म्हणजे नक्की देव किती आहेत. देव एक आहे
किंवा दोन आहेत किंवा तीन आहेत. ह्या प्रश्न वर जो तो ख्रिस्ती व्यक्ती आपापली मत
मांडून कोणी एक, कोणी दोन, तर कोणी तीन देव आहेत असे मानतात. पण शास्त्र
ह्याबद्दल आपल्याला काय सांगते ह्याकडे कोणीही बारकाईने अभ्यास करीत नाही.
बायबलमध्ये ह्याबद्द्ल अनेक उल्लेख उपलब्ध आहेत. पण गरज आहे ती त्यांचा योग्य
संदर्भात अर्थ समजून घेण्याचा. हा विषय फार गहन आहे म्हणून आपण टप्या-टप्याने
हा समजून घेण्याचा प्रयत्न करू या.
देव
आत्मा आहे व येशू हे त्याचे शरीर आहे
देवाचे रूप
देवाच्या रूपाबद्दल बायबल आपल्याला असे सुचित
करते की देव हा आत्मा आहे; आणि म्हणूनच अदृश्य
स्वरूपात आहे. (योहान ४:२४ वाचा).
योहान ४:२४
"देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने
व खरेपणाने केली पाहिजे".
देवाचे शरीर
संपूर्ण जुन्या करारामध्ये देवाच्या शरीराचा
उल्लेख नाही. पण तो आपले अस्तित्व विविध प्रकार
लोकांना दाखवत असे. जसे की मोशेला जळणारं झुडूपात, इस्राएल लोकांना दिवसा मेघ, आणि रात्री अग्निस्तंभात देवाचे दर्शन होत असे.
अनेकवेळा त्याने दूतांना पाठविले, जे जरी मनुष्यांसारखे
दिसत असत, पण कोणीही कधीही देवाला
भौतिक स्वरूपात पाहिले नाही, येशू ख्रिस्तापर्यंत! (योहान १:१८ वाचा).
योहान १:१८
“देवाला कोणीही कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो
त्याने त्याला प्रकट केले आहे.”
मनुष्याच्या पापांसाठी तो परमेश्वर देव स्वतः
पृथ्वीवर अवतरला, व त्याने मनुष्य रूप धारण केले. त्या मानवी
शरीराला त्याने 'येशू' हे नाव दिले. दुसऱ्या शब्दांत ह्याचाच अर्थ म्हणजे तो परमेश्वर देव येशू
ख्रिस्तासारखा दिसत आहे.
आता कोणी म्हणेल हे कसे काय शक्य आहे ?
प्रेषित पौल आपल्या पत्रात हे स्पष्ट शब्दांत
नमूद करत आहे कि, देव जो अदृश्य आहे त्याचा
येशू ख्रिस्त हा प्रतिरूप आहे. (कलस्सेकरांस पत्र
१:१५ वाचा)
कलस्सेकरांस पत्र १:१५
"तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत जेष्ठ आहे;”
ह्या वचनावरून हे सिद्ध होते कि, जर प्रभू येशू ख्रिस्त जर देवाचे प्रतिरूप आहे, तर मग तो आणि परमेश्वर देव हे वेगळे कसे असू शकतात ?
सत्य हे आहे कि, तो परमेश्वर देव जो एक
आत्मा आहे, त्याने या पृथ्वीवर जन्मांस
येण्यासाठी येशू नामक शरीराचा उपयोग केला आहे.
(ज्याप्रमाणे
एका मनुष्याचा आत्मा आणि शरीर हे दोन्ही वेगळे असतात, आणि ते दोघे मिळून तो मनुष्य बनत असतो; त्याप्रमाणे हे आहे. मृत्यूवेळी त्या मनुष्याचा
आत्मा निघून गेल्यावर मनुष्याचे शरीर हे मर्त्य अवस्थेत मागे राहते.)
त्याचप्रमाणे येशू मध्ये असलेला आत्मा हा देवाचा
होता, म्हणून तोच देव आहे. दुसऱ्या शब्दांत म्हणायचे तर, येशू ख्रिस्त हा देवाचे शरीर आहे. देवाचा आत्मा आणि येशूचे
शरीर मिळून एक एक देव होतो, दोन देव नव्हे!!!
तसेच प्रेषित पौल ह्या वरील वचनात तो अदृश्य
देव म्हणतो, ते अदृश्य देव म्हणत नाही. म्हणजेच प्रेषित
पौलाच्या लेखी एकच देव आहे, ज्याने त्याला दमास्कसच्या रस्त्यावर दर्शन
दिले होते.
ह्या वरील पवित्र शास्त्रातील वाचनानुसार हे
स्पष्ट होते आहे की, देव आत्मा आहे आणि त्याचे रूप येशू
ख्रिस्तासारखे आहे आणि येशू ख्रिस्ताच देवाचे शरीर आहे.
आता ह्या संदर्भावरून पुढे जाऊन आपण नक्की देव
किती आहेत त्याकडे अजून सखोल अभ्यास करू या.
देव
एक आहे
उत्पत्तीच्या पुस्तकात म्हटले लिहिले की "प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली. इथे 'देवाने' म्हटले आहे, (इंग्रजीत GOD म्हटलेले आहे) 'देवांनी' म्हटलेले नाही. म्हणजे निर्माण करणारा देव एकच आहे. (उत्पत्ती १:१ वाचा).
उत्पत्ती १:१
“प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली”.
त्यानंतर एदेन बागेत आदाम आणि हव्वा ह्यांना
भेटणारा / बोलणारा परमेश्वर एकच होता. त्यांना दोन किंवा तीन देव भेटत होते असे
कुठेही नमूद केलेले नाही. (उत्पत्ती २, ३ अध्याय वाचा). परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या १०
आज्ञामधील पहिल्या आज्ञेमध्ये तो म्हणतो की, “मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्याखेरीज तुला
वेगळे देव नसावेत”. इथे तो असे म्हणत नाही “आम्ही तुमचे देव आहोत”. परंतु तो म्हणतो 'मी', म्हणजे एकवचन 'एकटा' देव आहे. (निर्गम २०:२-३ वाचा) अनुवाद पुस्तकातही देवाचा उल्लेख एकवचनात केला
आहे. (अनुवाद ४:३९ वाचा)
निर्गम २०:२-३
"....तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्याखेरीज तुला वेगळे देव
नसावेत".
अनुवाद ४:३९
"म्हणून आज हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की, वर आकाशात व खाली पृथ्वीवर परमेश्वरच (एक) देव आहे."
पुढे यशयाच्या पुस्तकात मध्ये देव पिता म्हणतो
की तो एकटा देव आहे. (यशया ४५:१८) आणि माझ्यापूर्वी कोणीही परमेश्वर नव्हता आणि
माझ्यानंतरही कोणीही होणे नाही. केवळ मीच त्राता आहे. (यशया ४३: १०) इथे परमेश्वर म्हणतो की 'मी' म्हणजे एकवचन, तो "आम्ही" असे नाही म्हणत.
यशया ४५:१८
"…हा परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर आहे; अन्य कोणी नव्हे”.
यशया ४३: १०
"परमेश्वराचे असे म्हणणे आहे की ....माझ्यापूर्वी कोणी देव
नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही हे तुम्हाला समजावे म्हणून तुम्ही माझे
साक्षी आहा. मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही".
ह्या वरील पवित्र शास्त्रातील वाचनानुसार हे
स्पष्ट होते आहे की, बायबलमधील संपूर्ण जुन्या करारात (म्हणजेच
उत्पत्ती - मलाखी या पुस्तकांपर्यंत) आपल्याला फक्त एकच देव आढळतो.
तीन
देवाची शिकवण आणि त्याचा उगम
वरील वचनांनी आपल्याला समजते की जुन्या करारात एकच देव होता. मग आपल्याला अनेक असे प्रश्न उभे राहू शकतात ते असे,
१) मग नवीन करारामध्ये किंवा त्यानंतर खरंच एका
देवाचे तीन देव झाले काय ? ह्यात काही तथ्य आहे का ?
२) ह्या नव्या शिकवणीचा उगम कुठून झाले आणि कोणी
त्याच्या प्रसार केला?
३) आणि बायबल प्रमाणे त्याला काही आधार आहे का?
1) ह्याचे उत्तर नाही असे आहे. पवित्र शास्त्र आपल्याला एकच देवाची शिकवण देते.
2) त्रियेकाची शिकवण ही रोमन कॅथोलिक चर्चने
जन्माला घातलेल्या अनेक शिकवणी पैकी एक मुख्य शिकवण आहे. ही शिकवण ३२५ AD साली झालेल्या निसिया कौन्सिलमध्ये उभारली
गेली. कालांतराने प्रोटेस्टंट पंथीय जे मुळांत कॅथॉलिक चर्चमधून वेगळे झाले, त्यांनीही हीच शिकवण अंगिकारली. अशाप्रकारे ह्या शिकवणीचा प्रसार जगभर झाला आणि
ती आजवर चालत आली आहे.
अशाप्रकारे ह्या शिकवणीचा प्रसार जगभर झाला आणि ती आजवर चालत आली
आहे.
3) बायबल नुसार ह्या तीन देवाच्या शिकवणीला काहीही
आधार नाही.
रोमन
कॅथॉलिक तीन देवाच्या शिवणीचा आधार आणि त्याचे सत्य
रोमन कॅथॉलिक चर्च आपल्या ह्या नव्या शिकवणीला मत्तय २८:१९ ह्या वचनाचा मुख्य आधार असे मानते. ते वचन नक्की काय म्हणते आहे हे आपण नीट जाणून घेऊ या.
मत्तय २८:१९
“तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने
बाप्तिस्मा द्या; युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस
तुमच्याबरोबर आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने
बाप्तिस्मा द्या,
ह्या वरील वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो
की तुम्ही पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. पण ह्यात त्याने नावाने (म्हणजे एकवचन) म्हटले आहे, नावांनी (अनेकवचन) नाही! ह्याचा अर्थ ही वरील
वचनामध्ये येशू ख्रिस्त तीन व्यक्तींबद्दल बोलत नसून एका व्यक्तीबद्दल बोलत आहे.
मुळात हे तीन नाव नसून तीन उपाध्या आहेत. पिता कोणाचे नाव असते का ? तर ती उपाधी/ कार्यकक्ष आहे. पुत्र कोणाचे नाव
आहे का? तर नाही! तीही एक उपाधी आहे आणि त्याचप्रमाणे पवित्र आत्मा ही पण एक उपाधी
आहे. ह्या तीन उपाधी कोणाच्या आहेत आणि त्याचे नाव काय आहे हे आपल्याला समजले तर
आपल्याला खऱ्या देवाची ओळख होईल. त्या उपाधींचे खरे नाव "प्रभू येशू
ख्रिस्त" हे आहे आणि तो खरा देव आहे, अन्य कोणी नाही. कोणी म्हणेल हे कसे काय शक्य
आहे ?
रोमन कॅथॉलिक चर्च हे मत्तय २८:१९ ह्या वचनाला त्रियेक शिकवणीचा मुख्य आधार असे मानते. परंतु मत्तय २८:१९ ह्याचा वास्तविक अर्थ येशूच्या प्रेषितांना प्रकटीकरणाद्वारे समजावलं गेला आहे. ते आपण खालील ग्राफिक्सच्या माध्यमांतून पाहू या.
कोणी म्हणेल जुन्या करारात परमेश्वर ज्याला "यहोवा" हे नाव होते, तो नवीन करारात आपले नाव “येशू” म्हणून कसे काय बदलतो आणि त्यानंतर तो आता पवित्र आत्म्याने आपल्याबरोबर कसा आहे हे तर ते आपण सविस्तरपणे बघू या.
येशू
ख्रिस्त हाच यहोवाचे देहरूप आहे
सत्य हे आहे जुन्या करारातील यहोवा हाच नवीन करारातील येशू आहे. हेच काय ते दैवत्वाचे महान रहस्य आहे. तीन देव नसून ते एकच देवाचे तीन कार्यकक्ष आहेत. पवित्र शास्त्रामध्ये कुठेही आपल्याला तीन देव आहेत असे सुचित केले नाही. कारण असे आपण जर केले, तर देवाने दिलेल्या १० आज्ञांपैकी पहिली आज्ञा मोडतो. जी म्हणते की "मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत."
सविस्तर स्पष्टीकरण: जुन्या करारातील "यहोवा"
परमेश्वर - ज्याने ही सारी श्रुष्टी निर्माण केली, ज्याने आपले अध्यपालक आदाम आणि हव्वा ह्यांना
निर्माण केले, तो आत्मा रूपात होता. तेथे त्याचे मानवी शरीर
नव्हते. ज्याप्रमाणे देव अविनाशी होता त्याप्रमाणे आदाम आणि हव्वा पण अविनाशी होते; कारण ते देवाचे लेकरे होते. पण आदाम आणि हव्वा ह्यांनी जेव्हा देवाचे आज्ञाभंग
करून देवाविरुद्ध पाप केले तेव्हा ते जे अविनाशी होते, त्यातून ते मर्त्य स्वरूपात बनले गेले. देवाशी मनुष्यांचे संबंध तुटले गेले.
ह्यामुळे पापाबरोबर मरणाने मनुष्यांत प्रवेश केला. मृत्यूबरोबर त्यांच्यात रोगराई
आणि पीडा ह्या उत्पन्न झाल्या. ह्या कारणामुळे संपुर्ण मानवजात पापात पडली. जे
आजपर्यंत आपण भोगत आहो.
जुन्या करारामध्ये पापाचे प्रायश्चित म्हणून
निर्दोष कोकरा / बकऱ्यांचे रक्त अर्पण करीत असत. पण ह्या प्रथेने पाप केवळ झाकले
जात असत, पुसले जात नसत. कारण
कोकऱ्यांचे / बकऱ्यांचे मनुष्यांच्या
पापाबद्दल संपूर्ण नष्ट करण्यास समर्थ नव्हते. त्यासाठी म्हणून गरज होती एक
निर्दोष निष्कलंक मनुष्याचे रक्त अर्पण करण्याची. म्हणून यहोवा परमेश्वराने एक महान मुक्तीची योजना आखली. ती म्हणजे यहोवा परमेश्वर स्वतः, ज्याला "पिता" म्हटलेलं आहे तो संपूर्ण जगाच्या पापाच्या
प्रायश्चित करण्यासाठी "मनुष्यांच्या पुत्र" म्हणजे "येशू
ख्रिस्त" बनून ह्या जगात आला. त्याने मरीयेच्या पोटी जन्म घेऊन मनुष्य
शरीर धारण केले. त्याचा जन्म मनुष्य वासने प्रमाणे न होता, देवाच्या सिद्ध शब्दाने झाला. (गॅब्रिएल दूताद्वारे दिलेला देवाचा शब्द
स्वीकारताच मरीयेने ग्रभधारण केले) त्यामुळे तो शुद्ध व पवित्र असा होता. त्याने
मनुष्यांमधे सर्वोच नाव म्हणजे "येशू" हे नाव धारण केले. त्याने
क्रुसावर स्वतःला अर्पण करून, आपल्या पवित्र व निष्कलंक रक्ताद्वारे जगाच्या
पापांसाठी प्रायश्चित अर्पण केले. ह्याद्वारे येशूला "ख्रिस्त"
ही उपाधी मिळाली. ख्रिस्त चा अर्थ म्हणजे 'मसीहा / तारणारा'. येशू ख्रिस्त जरी मनुष्य होता तरी त्याचा आत्मा
हा यहोवा परमेश्वर स्वतः होता. वास्तविक गोष्ट ही आहे की, तेथे आत्म्याच्या स्वरूपात असलेल्या यहोवाने, "येशू” नामक शरीर पांघरले होते, हे लक्ष्यात घेणे फार महत्वाचे आहे. यहोवा परमेश्वर आपल्या स्वर्गीय
वैभवातून 'येशू' नामक शारिक देहामध्ये वास्तवास आला, जेणेकरून त्याने तो तारणारा, मुक्तिदाता आणि आरोग्यदाता (पापांमुळे आलेले रोग आणि पीडा पासून आरोग्य देण्यास) असल्याचा त्याचा सार्वभौम उद्देश पूर्ण करू शकला.
हे रहस्य येशू ने लोकांना पुष्कळ वेळा
प्रत्येक्ष आणि अप्रत्येक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न केला; पण यहुदी धर्मवेडे शास्त्री आणि परूशी ते समजू शकले नाहीत आणि म्हणून त्यांनी
त्याला ओळखळे नाही. खरे म्हणजे ते त्याची म्हणजे "मसीहा"
ची फार आतुरतेने वाट पाहत होते. पण तो अशाप्रकारे मेंढवाढ्यात जन्मास येईल ह्याची
त्यांनी कल्पनाच केली नव्हती. म्हणून ते सर्व त्याच्यासंबंधी अडखळले गेले. (योहान ८:५५, योहान १०: ३८ वाचा). येशू आपल्याला मार्क १२:२९ मध्ये सांगतो की, आपला परमेश्वर हा एक आहे".
मार्क १२:२९
"येशूने उत्तर दिले, हे इस्राएला, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य (एक) परमेश्वर आहे;"
योहान ८:५५
तरी तुम्ही त्याला ओळखले नाही; मी त्याला ओळखतो (कारण तो स्वतः तो होता), आणि मी त्याला ओळखीत नाही असे जर मी म्हणेन तर मी
तुमच्यासारखा लबाड ठरेन; पण मी त्याला ओळखतो व त्याचे वाचन पाळतो.
योहान १०: ३८
“माझ्यावर विश्वास न ठेवला तर तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा; अश्यासाठी की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे, हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे".
आता ह्या वरील वचनामध्ये येशू म्हणतो कि,”माझ्यामध्ये पिता आणि पित्यामध्ये मी आहे”. हे कसे काय शक्य आहे ? जगात कोणीही पिता आणि पुत्र हे दोघेहि वेगळे मनुष्य
म्हणून गणले जातात. मग येशूच्या ह्या वाचनाचा अर्थ काय आहे ? तर ह्याचा अर्थ असाच आहे कि तो आत्म्याच्या
स्वरूपात असलेल्या यहोवा परमेश्वर, त्या येशू नामक शरीरात
कार्य करत होता, आणि त्याच आत्म्याला, येशू "पिता" म्हणून संभोदित होता. ह्याचा अजून एक
संदर्भ आपण आता पुढे पाहू या.
पुढे योहान लिखित शुभवर्तमानात प्रभू येशू
उघडपणे म्हणतो की पिता आणि मी एक आहे. ज्याने मला पाहिले, त्याने पित्याला पाहिले आहे. माझ्याकडे आल्याशिवाय पित्याकडे कोणाला येत येत
नाही. (योहान १०: ३० , योहान १४: ६ वाचा)
योहान १०: ३०
"मी आणि पिता एक आहो"
योहान १४: ६
"येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही". मी
कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते; आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला तुम्ही पाहिलेही आहे".
आता जगातला कोणता मुलगा म्हणेल मी आणि माझा
पिता दोघेहि एक आहो म्हणून ? तर कोणाचं असे म्हणू शकत
नाही. कारण मुळांत ते दोघे दोन वेगळे व्यक्ती आहेत आणि त्यांचे दोन वेगवेगळे
शरीर आणि आत्मे ही आहेत. पण येशू ख्रिस्तात असलेला
आत्मा हा पित्याचा म्हणजे यहोवा परमेश्वराचा असल्यामुळे तो असे म्हणू शकत होता. इथे आत्मा देवाचा आणि शरीर मनुष्याचे असे आहे हे
जाणून घेणे महत्वाचे आहे.
त्यानंतर येशू अजून स्पष्ट्पणे म्हणतो की
"मला पित्याने पवित्र कारणास्तव (म्हणजे मुक्तिदाता बनून) पाठवले आहे आणि मी
आपल्या पित्याचे कृत्ये करतो (म्हणजे आरोग्यदान, चमत्कार इत्यादी ). तो म्हणतो जरी तुमचा
माझ्यावर विश्वास नसला तरी माझ्या कृत्यावर विश्वास ठेवा. एवढे उघड बोलून सुद्धा
लोकांनी त्याला ओळखले नाही. (योहान १०:३६-३८ वाचा).
योहान १०: ३६ - ३८
तर ज्याला पित्याने पवित्र कारणास्तव नेमून जगात
पाठविले त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावर तुम्ही
दुर्भाषाण करितां असे तुम्ही म्हणता काय ?
मी आपल्या पित्याचे कृत्ये करीत नसल्यास माझ्यावर
विश्वास ठेवू नका; परंतु जर मी ती करितो तर माझ्यावर विश्वास न
ठेवला तर तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा; अश्यासाठी की, माझ्यामध्ये पिता या पित्यामध्ये मी आहे, हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे".
त्याच योहानाच्या शुभवर्तमानात येशू
त्याकाळच्या शास्त्रयांपुढे म्हणतो त्यांना त्याची स्वतःची ओळख देण्यासाठी म्हणतो
की " मी अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे". (योहान ८ :५८ वाचा).
योहान ८ :५८ वाचा
"येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे". ह्यावरून त्यांनी त्याला मारण्यासाठी दगड
उचलले".
आता ३० वर्षीय येशू असे कसे म्हणू शकतो की मी अब्राहाम (यहुद्यांचा अध्यापिता जो हजारो वर्षा
अगोदर जन्मला होता) ह्याच्या अगोदर पासून आहे? मानवी बुद्धीला हे मूर्खपण असे आहे. पण दैवी प्रकटीकरणाने हे फार सोपे असे
आहे. कारण येशू मध्ये असणारा आत्मा यहोवाचा
असल्यामुळे तो असे म्हणू शकत होता, कारण योहोवा परमेश्वर सर्व श्रुष्टीचा निर्माणकर्ता आहे आणि त्याच बरोबर
अब्राहामाच्या अगोदरचा आहे. म्ह्णून इथे येशू जे म्हणतो आहे, तेच सत्य आहे.
हे रहस्य शास्त्री, परूशी आणि त्याकाळातील इतर लोकं समजण्यास असमर्थ ठरली. म्हणून आपण पण जी चुकी त्यांनी
देवाला ओळखण्यात केली, तीच चुकी पुन्हा आपण
करावी काय ? तर नाही. हाच महत्वाचा प्रश्न आहे.
तर ह्या सर्व वरील संदर्भांवरून हे स्पष्ट होते
कि, पिता आणि पुत्र हे दोघेही एक आहेत म्हणजेच यहोवा आणि येशू हे दोघेही दोन
व्यक्ती नसून एक आहेत.
येशूचा
आत्मा म्हणजेच पवित्र आत्मा आहे
वरील वचनांनी हे सिद्ध होते की पिता (म्हणजे
जुन्याकारातील यहोवा) आणि पुत्र (नवीन करारातील येशू ख्रिस्त) हे दोन व्यक्ती नसून
एक आहेत. आता आपण पवित्र आत्म्याकडे येऊ या.
रोमन कॅथॉलिक शिकवण ही पवित्र आत्मा एक वेगळी
तीसरी व्यक्ती आहे असे शिकवते. मुळांत तसे नसून तो तोही त्याच यहोवा देवाचा
आत्मा आहे, जो प्रभू येशू मध्ये होता. फक्त त्याच्या स्वरूपात बदल झाला आहे. ते कसे
ते आपण आता पाहू या.
येशू ख्रिस्त मत्तय शुभवर्तमानांमध्ये आपल्या
स्वर्गरोहणाच्या वेळी तेथे उपस्थित लोकांना म्हणाला की "युगाच्या
समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे". (मत्तय २८:२० वाचा)
मत्तय २८:२० वाचा
“युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे"
आता कोण म्हणेल येशू ख्रिस्त हा तर पृथ्वीवरील
लोकांना सोडून वर स्वर्गात जात होता, तरी पण म्हणतो की मी तुमच्या बरॊबर जगाच्या
अंतापर्यंत असेन. हे कसे काय शक्य आहे ? तो एकाच वेळी स्वर्गात आणि पृथ्वीवर असणार आहे
काय ? तर हो! जो आत्मा येशू ख्रिस्त म्हटलेल्या
शरीरात होता, तो आत्मा आता फक्त आत्मा रूपात येणार होता आणि
युगाच्या अंतापर्यंत सर्व लोकांबरोबर राहणार होता आणि तोच आत्मा येशू ख्रिस्ताच्या
स्वर्गरोहणानंतर पन्नासाव्या दिवशी म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवशी (प्रेषित कृत्ये २: १-१३) येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांत उतरला. तोच देवाचा आत्मा आज ही
आपल्या बरॊबर आहे.
योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो की
जो कैवारी आत्मा मी तुम्हाकडे पाठवीन, तो माझ्या विषयी साक्ष देईल. (योहान १५:२६
वाचा)
योहान १५:२६ - योहान १६: १
"परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हांकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे
सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल; आणि तुम्हीही साक्ष साक्ष द्याल,कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहां."
"तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी
सांगून ठेवल्या आहेत."
प्रभू येशुने आपले प्रेषित पुढे त्याच्या
अनुपस्थीतीत ह्या रहस्याविषयी फसू नयेत म्हणून त्याने
आपल्या मरणाअगोदर प्रेषितांस आगाऊच सांगून ठेवले होते. (योहान १६:१ वाचा)
त्याचप्रमाणे वरील योहान १५:२७ ह्या वचनाप्रमाणे, प्रेषितांनी खरंच
येशूविषयी साक्ष दिले आहे. (प्रेषित कृत्ये २:१४-४१ वाचा)
आता कोणी व्यक्ती म्हणेल की पवित्र आत्मा
येशूचाच आहे हे कशावरून ?
ह्यासाठी प्रभू येशू स्वतः काय म्हणतो ते पहा.
"मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हांकडे येईन". (योहान १४: १६-१८
वाचा)
योहान १४:१८
“मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हांकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही; पण तुम्ही मला पाहाल; मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या
दिवशी तुम्हांला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हांमध्ये आहे".
खरंच प्रभू येशू स्वर्गरोहणानंतर येशू ख्रिस्त
त्याच्या शरीरात पृथ्वीवर पुन्हा परत आला का ? तर नाही. पण तो म्हणतो की मी येईन. येथेच पुष्कळ लोक संभ्रमात पडतात. तो आला
देखील, पण अधू दृष्टीच्या लोकांना समजले सुद्धा नाही. कारण तो पवित्र आत्म्याच्या
रूपाने आला.
पुढे तो म्हणतो की ज्या आत्म्याला पिता माझ्या
नावाने तुम्हाकडे पाठवील. कोणाच्या तर 'प्रभू येशूच्या नावाने". (योहान १४:२६ वाचा) पण तो फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये आला, सर्व लोकांना मध्ये नाही. म्हणून तो म्हणतो "मग जग मला आणखी पाहणार नाही; पण तुम्ही मला पाहाल; ". म्हणजे जे त्याच्यवर विश्वास ठेवतात त्यांना तो
त्यांच्यात दिसतो.
योहान १४:१६
"मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे".
योहान १४:२६
"तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे
पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील...
थोड्यात सांगायचे तर
जुन्याकरारांतील यहोवा ह्याने आपला आत्मा येशू ख्रिस्तामध्ये ओतला, आणि येशूच्या मृत्यू आणि
स्वर्गरोहणानंतर तोच आत्मा आता जगात पुनः पवित्र आत्म्याच्या रूपाने परत
त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांत पृथ्वीवर उतरला आणि तो आताही कार्य करत आहे.
ह्या वरील वचनांनी हे सिद्ध होते की एकाच देवाचे तीन वेगळे व्यक्ती नाहीत, तर देवाच्या आत्म्याचे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे
तीन कार्यकक्ष आहेत.
येशूचे
प्रेषित सुद्धा एकाच देवाला मानतात आणि तो म्हणजे 'प्रभू येशू ख्रिस्त'
पण येशूचे प्रेषित हे रहस्य समजले होते. म्हणून त्यांनी येशूच्या स्वर्गरोहनानंतर “प्रभू येशू ख्रिस्त” हाच देव आहे हे शुभवर्तमान सांगणास सुरवात केली. त्याच्या नावाने पापाची क्षमा होण्यासाठी “प्रभू येशू ख्रिस्ताच्या" नावाने बाप्तिस्मा देऊ लागले. (प्रेषितांचे कृत्ये २:३८, प्रेषितांचे कृत्ये १९:६) कोणी म्हणेल पण येशूने मत्तय २८ मध्ये "पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्यास सांगितला होता". मग प्रेषीत मूर्ख होते काय ? तर नाही. त्यांना त्या वचनचा खरा अर्थ प्रकटीकरणाने समजला होता हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
प्रेषितांचे कृत्ये २:३८
“पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी
म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हाला पविता आत्म्याचे दान प्राप्त होईल. “
प्रेषितांचे कृत्ये १९:६
“हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला…”
संत पौल आपल्या कलससैकरांस पत्रात (कलससैकरांस पत्र २:९
वाचा) म्हणतो की "ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व
पूर्णता मूर्तीमान वसते". म्हणजे येशू ख्रिस्ताच्या ठावी असणारा आत्मा हाच
देवाचा आत्मा आहे असे पौल इथे सांगतो. त्याच ओळीमध्ये पुढे तो म्हणतो की "जो
(ख्रिस्त) सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण
केलेले आहा" म्हणजे सर्व सत्ता आणि अधिकार येशू ख्रिस्ताकडे आहेत. मग जर
येशूचा पिता म्हणजे यहोवा जर वेगळा आहे, तर त्याच्याकडे कोणते ही अधिकार नाहीत असे
प्रतीत होते की नाही ? ह्या वाचनावरून आपल्याला कळते की, यहोवा पिता आणि येशू ख्रिस्त हे दोघे वेगळे
नसून एक आहेत. आपण आधी पाहिले की येशू आणि पवित्र आत्मा हे देखील दोघे नसून एक
आहेत.
कलससैकरांस पत्र २:९
“कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तीमान वसते, आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये
तुम्ही पूर्ण केलेले आहा.”
मग
रोमन कॅथॉलिक चर्चची तीन देवाची शिकवण चुकीची आहे काय ?
मुळात प्रेषितांच्या शिकवणी वर आधारलेल्या
देवाच्या मंडळीचा जेव्हा रोमन राजकारण्यांशी (Constantine) मिलाप झाला तेव्हा हो रोमन
कॅथॉलिक पंथ स्थापन झाला. त्यांनी रोमन अनेक दैवतांप्रमाणे (झ्यूस, गुरू, हर्मीस , शुक्र, बुध , इत्यादि) ह्याप्रमाणे ख्रिस्ती शिकवणी मध्ये
अनेक दैवतांची शिकवनीची भर घातली. इथेच त्यांनी देवाच्या मूळ शिकवणी पासून फारकत
घेतली. निसिया कौन्सिलमध्ये उभारलेल्या रोमन कॅथॉलिक चर्चच्या ह्या तीन देवाची
शिकवणीला बायबल मध्ये कोणताही आधार सापडत नसून ते त्यांच्या "धर्मशिकवण"
म्हणजेच "Catechism" ह्या मनुष्य शिकवणीवर आधारित आहे. बायबल आपल्याला अशा
मनुष्यांच्या तत्वज्ञानांवर उभारलेल्या शिकवणीपासून दूर राहायला सांगते. (कलससैकरांस
पत्र २:८ वाचा ) तसेच बायबल असेही म्हणते की मनुष्य खोटा ठरो आणि देव (म्हणजे त्याचे
वचन) खरे ठरो. (रोमकरांस पत्र ३:४).
कलससैकरांस पत्र २:८
"ख्रिस्ताप्रमाणे
नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले
तत्वज्ञान व पोकळ भूलथापा ह्यांच्या योगाने तुम्हांला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये
म्हणून लक्ष द्या;"
रोमकरांस पत्र ३:४
"देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो;"
ह्या सर्व वरील संदर्भाच्या
आधारे आता आपल्याला ठरवायचे आहे की, आपण देव जे म्हणतो ते स्वीकारायचे, की मनुष्यांची शिकवण (रोमन कॅथॉलिक शिकवण) स्वीकाराची ?
सारांश: ह्या सर्व वचनाच्या आधारे आपल्याला स्पष्ट
होते की, जुन्याकरारातील यहोवा हा
नवीन करारातील येशू आहे आणि त्याच येशूचा आत्मा त्याच्या स्वर्गरोहणानंतर पवित्र
आत्मा म्हणून उतरला आहे. हेच दैवत्वाचे महान रहस्य आहे.
वरील सर्व वचनांनी हे सिद्ध होते की एकच
देवाच्या आत्म्याचे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तीन कार्यकक्ष आहेत.
ते तीन वेगळे व्यक्ती नाहीत. अर्थातच रोमन कॅथॉलिक शिकवणी प्रमाणे तीन देव
नसून ते एकच देवाचे तीन कार्यकक्ष आहेत.
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
Contact Details / संपर्क माहिती :
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
Marathi Christian Gospel - India
© 2016 - 2018 Digital सुवार्तिक All Rights Reserved
No comments:
Post a Comment