प्रेषित पेत्र खरंच पहिला पोप
होता का ? "Was Saint Peter
the First Pope?"
पोप - व्याख्या: पोप हे रोमचे बिशप (पाळक) असून जगभरातील कॅथोलिक मंडळी/चर्चचे सर्वोच नेते आहेत. रोमन बिशपची
सर्वश्रेष्ठता मुख्यत्वे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्राचा पारंपारिक उत्तराधिकारी म्हणून संबोधित केलेली आहे. पोपचे कार्यक्षेत्र हे पोपसत्ताक पद्धती वर आधारित असून रोममध्ये
स्थापलेले आहे. त्यांच्या उपदेशात्मक कार्यकक्ष, म्हणजेच "रोम धार्मिक प्रदेश"
ह्याला पवित्र किंवा प्रेषितीय देखरेख म्हणून म्हणून संबोधले जाते.
हे पद ह्या शिकवणीवर आधारलेले आहे की, पेत्राला येशूने तथा कथित स्वर्गाच्या किल्ल्या सोपविलेल्या आहेत आणि त्याला
स्वर्गात आणि पृथ्वीवर काहीही "बांधण्याचे व सोडण्याचे" अधिकार दिले आहेत. रोमन कॅथॉलिक
चर्च हे पोप साहेबांना प्रेषित पेत्राचा उत्तराधिकारी म्हणून मानतात. आज हे पद सर्व जागतिक कॅथॉलिक पंथीयांचे व त्यांना संलग्न अशा सर्व संस्थांच्या शासनास जबाबदार आहे.
पार्श्वभूमी: आज रोमन कॅथोलिक चर्च प्रेषित पेत्राला पहिले पोप म्हणून
मानते आणि त्याने प्रेषितपणाचे सर्व अधिकार रोमन बिशप म्हणजेच "पोप"
ह्यांच्या स्वाधीन केले आहेत असे शिकवते. आज आपण ही शिकवण कोणत्या तत्वांवर आधारलेली आहे आणि
ह्यात किती तथ्य आहे, हे पडताळून पाहू या.
पोप
संधर्भात रोमन कॅथॉलिक चर्चचा विश्वास व शिकवण
पोपसंबंधी रोमन कॅथॉलिक चर्चची शिकवण ह्या चार तत्वांवर आधारित आहे:
Ø प्रेषित पेत्र हा पहिला पोप होता, ज्याला देवाने त्याची मंडळी तयार करण्यासाठी निवडले होते.
Ø पेत्राला इतर सर्व प्रेषितांवर व ख्रिस्ती
मंडळीवर अधिकार होता.
Ø तो अधिकार पेत्रानंतर प्रेषितीय परंपरेने रोमन
बिशप ह्यांच्या स्वाधीन करण्यात आला (ज्याला इंग्रज़ीमध्ये " Apostolic Succession म्हणतात)
Ø पेत्र व त्यानंतरच्या सर्व पोप, हे सर्व पोप म्हणून त्यांचे स्थान व त्यांचा अधिकार
ह्यापासून ख्रिस्ती मंडळीतील कोणतीही धार्मिक समस्या हाताळण्यात अचूक होते व आहेत.
सविस्तर स्पष्टीकरण: आज रोमन कॅथोलिक चर्चचा असा समज आहे की, प्रेषितांचे कृत्ये पुस्तकात नोंदविण्यात आलेल्या घटनानंतर प्रेषित पेत्र हा रोमचा पहिला बिशप (पाळक) झाला. त्यावेळी रोमन बिशप सर्व ख्रिस्ती लोकांमध्ये केंद्रीय प्राधिकरण किंवा अधिकारी म्हणून स्वीकारलेला असा होता. रोमन कॅथॉलिक तत्वज्ञान्यांनी अशी शिकवण शिकवण विकसित केली आहे की, देवाने पेत्राचा प्रेषितीय अधिकार नंतर वारसाहक्काने रोमन बिशपच्या आसनावर बसणाऱ्यांच्या स्वाधीन केला. ह्या शिकवणीला रोमन कॅथॉलिक चर्च "प्रेषितीय वारसाहक्क परंपरा" म्हणून संबोधतात; ज्याला इंग्रज़ीमध्ये " Apostolic Succession" म्हणतात.
रोमन कॅथोलिक चर्च असे ही मानते की पेत्र व
त्यानंतरच्या सर्व पोप हे सर्व पोप म्हणून त्यांचे स्थान व त्यांचा अधिकार
ह्यापासून ख्रिस्ती मंडळीतील कोणतीही धार्मिक समस्या हाताळण्यात अचूक होते व आहेत. त्यांचे सर्व शब्द व
निर्णय अचूक आहेत. हा अचूकपणा पोप ह्यांना ख्रिस्ती मंडळीला योग्य
मार्गदर्शन करण्याची क्षमता देते असे ते शिकवतात. रोमन कॅथोलिक चर्च हे पोपची अखंड वारशाची ओळ संत पेत्रापर्यंत नेऊन रेखाटण्याचा दावा करतात; आणि ह्याच पुराव्यावरून ते खरी
ख्रिस्ती मंडळी आहेत असा ठाम दावा करतात. कारण त्यांचा विवराणानुसार, प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्रावर त्याची मंडळी बांधली. (मत्तय १६:१८ वाचा)
मत्तय १६:१७-२०
“येशू त्याला म्हटले, शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या
स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी
रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार
नाही.
मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन
आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू
मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्यांनी शिष्यांस निक्षून
सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका.
मग
काय खरंच पेत्र पहिला पोप होता ?
ह्याचे उत्तर पवित्र शास्त्रानुसार, स्पष्ट "नाही" असे आहे. मुळांत पवित्र शास्त्रात प्रेषित पेत्र रोम शहरात गेल्याचे एकही संदर्भ नाही. त्याऐवजी पवित्र शास्त्रात पेत्र "बाबेल" म्हणजे “Babylon” जे सध्या इराक देशात आहे, मध्ये गेल्याचा फक्त एक संदर्भ आहे. (१ पेत्र ५:१३ वाचा). प्रामुख्याने या शिकवणीने आणि रोमन बिशप ह्यांच्या प्रभावात होत गेलेली ऐतिहासिक वाढ ह्यामधून "रोमन बिशपंची ख्रिस्ती मंडळींवर सर्वश्रेष्ठता" ह्या रोमन कॅथोलिक शिकवणीचा उगम झाला. पण ह्याला शास्त्रात कुठे आधार सापडत नाही.
१ पेत्र ५:१३
"बाबेलांतील तुम्हांसारखी निवडलेली मंडळी तुम्हांला सलाम सांगते; आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो."
पेत्राचा
इतर प्रेषित व ख्रिस्ती मंडळीवरचा अधिकार
होय, हे मान्य करण्यात काही गैर नाही की, प्रेषित पेत्राची इतर प्रेषितांमध्ये एक नेतृत्वाची भूमिका होती, आणि आरंभी सुवार्तेच्या प्रसारामध्ये पत्राने फार महत्त्वाची भूमिका पार पाडली. (प्रेषितांचे कृत्ये १-१० अध्याय वाचा) तरीही शास्त्र आपल्याला पेत्राला इतर प्रेषितांवर किंवा मंडळीवर अधिकार होता, किंवा त्यांच्यात तो "सर्वोच्च नेता" होता म्हणून कुठेही असे सांगत नाही. (प्रेषितांची कृत्ये १५: १-२३ ; गलती २ : १-१४ ; आणि १ पेत्र ५ : १-५ वाचा) स्वतः पेत्रानेही कोठेही इतर प्रेषितांवर सर्वाधिकाराचा दावा केला नाही. त्याच्या कोणत्याही लिखाणामध्ये (१ आणि २ पेत्राचे पत्र ) कोठेही पेत्राने त्याच्या कोणत्याही विशेष भूमिकेचा दावा किंवा मंडळीवर अधिकाराचा दावा केला नाही.
मुळांत पवित्र शास्त्रातील संदर्भांवरून इतर प्रेषितही पेत्राबरोबर अधिकाराचे सम: भागीदार होते हे लक्षात येते. (इफिस २ : १९-२० वाचा) आणि त्याचा "सोडण्याचा व बांधण्याचा" अधिकार हा स्थानिक मंडळ्यांमध्ये सारखाच वाटण्यात आला होता. (मत्तय १८: १५-१९ ; १ करिंथ ५: १-१३ ; २ करिंथ १३:१०; तीत २:१५; ३: १०-११ हे संदर्भ वाचा).
म्हणजेच रोमन कॅथॉलिक शिकवणीप्रमाणे प्रेषित पेत्राचा ख्रिस्ती मंडळींवरचा सर्वाधिकार, जो मुळांत अस्तित्वातच नव्हता, तो पुढे रोमन बिशॉपच्या हाती आलाच कुठून? हा खरा प्रश्न आहे.
पेत्राचा
ख्रिस्ती मंडळीवरचा अधिकार पेत्रानंतर प्रेषितीय परंपरेने रोमन बिशॉप ह्यांच्या
स्वाधीन करण्यात आला...
पवित्रशास्त्रात कुठेही पेत्र, किंवा इतर कोणाही प्रेषित "त्यांचे प्रेषितीय अधिकार वारसाहक्काने
त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना वारसाने मिळतील” असे कुठेही सांगत नाही. कारण मुळांत सर्व अधिकार हे केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहेत. (मत्तय २८:१८ वाचा) आणि त्याने तो अधिकार कोणालाहि दिलेला आहे असे पवित्र शास्त्र तर
कुठेही सांगत नाहीत. म्हणूनच पेत्र स्वतः आपणा सर्वांना मंडीळीचा खरा मेंढपाळ व
संरक्षक जो प्रभू येशू ख्रिस्त ह्याकडे निर्धेशीत करतो. (१ पेत्राचे पत्र २:२५ वाचा)
मत्तय २८:१८
"तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलतांना म्हणाला, स्वर्गात आणि पृथीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे;”
१ पेत्र २:२५
"कारण तुम्ही मेंढरासारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक ह्याच्याकडे
तुम्ही परत फिरला आहां."
त्याचप्रमाणे पवित्र शास्त्रात "रोमन बिशप, किंवा इतर कोणालाही ख्रिस्ती मंडळींमध्ये सर्वश्रेष्ठता होती" असे कुठेही
आढळत नाही. कारण ख्रिस्ती मंडळींचा मुख्य तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. (कलसैकरांस
पत्र १:१८, इफिसकरांस पत्र ५:२३, इफिसकरांस पत्र १:२२ वाचा)
कलसैकरांस पत्र १:१८
"तोच शरीराचे म्हणजे मंडळींचे मस्तक आहे; अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे."
इफिसकरांस पत्र ५:२३
"कारण जसा ख्रिस्त मंडळींचा मस्तक आहे,…”
इफिसकरांस पत्र १:२२
"त्याने सर्व काही त्याच्या (म्हणजेच येशूच्या) पायांखाली
ठेवले, आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून
त्यास मंडळीला दिले;"
त्यामुळे प्रभू येशू सोडून इतर कोणाकडेहि
मंडळींचा अधिकार असल्याचा दावा आपल्याला शास्त्रात सापडत नाही. आणि ख्रिस्त हा
मस्तक (मुख्य) असल्यामुळे मंडळीसंदर्भात सर्व निर्णय घेण्याचा अधिकार केवळ त्यालाच
आहे; कोणा मर्त्य मनुष्यास नाही. ही तर प्रभू येशूला बाजूला करून ख्रिस्ती मंडळींवर
आपला अधिकार लादण्यासाठी उभारलेली एक रोमन कॅथॉलिक चर्चची शिकवण आहे.
जरी प्रभू येशूने पेत्राला त्याची मेंढरे
सांभाळण्याचे आदेश दिला असला, तरीही पेत्र आपणा स्वतःला खरा मेंढपाळ म्हणवून
घेत नाही; तर तो प्रभू येशू ख्रिस्तालाच खरा मेंढपाळ असे संबोधतो; कारण पेत्र प्रभू येशूने लावून दिलेल्या नियमांवर व उपदेशावर चालत होता, आपल्या स्वतःच्या बुद्धी किंवा चातुर्यावर नाही.
पण रोमन कॅथॉलिक चर्चची शिकवण जी माणसांच्या बुद्धीवर आधारित आहे, ती आपणाला या विरुद्ध शिकवते. ते असे शिकवतात की पेत्र (आणि पर्यायाने त्यानंतरचे सर्व पोप) सांगतील तोच खरा उपदेश आहे. त्यांना ह्या शिकवणीप्रमाणे पवित्र वचनात बदल करण्याची बुद्धी व अधिकार हा देण्यात आला आहे; जे पवित्र शास्त्राप्रमाणे धाधंत खोटे आहे; कारण प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या शेवटी असे लिहिले आहे कि, ह्या पुस्तकात कोणीही काहीही घालू किंवा काहीही काढू नये. (प्रकटीकरण २२:१८-१९ वाचा)
पण रोमन कॅथॉलिक चर्चची शिकवण जी माणसांच्या बुद्धीवर आधारित आहे, ती आपणाला या विरुद्ध शिकवते. ते असे शिकवतात की पेत्र (आणि पर्यायाने त्यानंतरचे सर्व पोप) सांगतील तोच खरा उपदेश आहे. त्यांना ह्या शिकवणीप्रमाणे पवित्र वचनात बदल करण्याची बुद्धी व अधिकार हा देण्यात आला आहे; जे पवित्र शास्त्राप्रमाणे धाधंत खोटे आहे; कारण प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या शेवटी असे लिहिले आहे कि, ह्या पुस्तकात कोणीही काहीही घालू किंवा काहीही काढू नये. (प्रकटीकरण २२:१८-१९ वाचा)
प्रेषित पौल हा ख्रिस्ती मंडळ्यांना तीत, तीमथ्य आणि इतर मंडीळीचे नेत्यांना कुठेही बिशप म्हणून स्वीकारण्यास सांगत नाही. तर त्याउलट, त्याचे सोबतीची सहकारी किंवा मजूर म्हणून स्वीकारण्यास सांगतो. (१ करिंथकर १६:१० ; १६:१६, २ करिंथकर ८:२३ वाचा) . हे सत्य रोमन कॅथॉलिक प्रेषितीय वारसाहक्काची
परंपरा ह्या शिवकवणीला खोटे ठरवते.
याचाच अर्थ रोमन कॅथॉलिक शिकवण जी म्हणते की
" प्रेषितांवरचा तो अधिकार पेत्रानंतर प्रेषितीय परंपरेने रोमन बिशॉप
ह्यांच्या स्वाधीन करण्यात आला" ही संकल्पनाच मुळांत शास्त्रापासून नसून
मनुष्यांच्या तर्कशास्त्रावर आधारित आहे. खरे सत्य हे आहे की, संपूर्ण ख्रिस्ती मंडळीवर आपला अधिकार गाजविण्यासाठी रोमन बिशप आणि चर्च
ह्यांनी ही खोटी शिकवण रुजवलेली आहे.
म्हणजेच ही शिकवण तर पवित्र शास्त्रात प्रभू येशूने आगाऊ
सांगितल्याप्रमाणे, शेवटल्या दिवसांत उभारलेली खोटी शिकवणीतील एक आहे आणि
शास्त्र आपल्याला अशा शिकवणीपासून दूर राहण्यास शिकवते. प्रभू येशू
ख्रिस्तानेही शेवटल्या दिवसांत येणाऱ्या खोट्या संदेष्ट्यापासून सावध राहायला
सांगितले आहे. (मत्तय ७:१५-१६ वाचा)
मत्तय ७:१५-१६
"खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने
तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या
फळांवरून तुम्ही त्याला ओळखाल. "
प्रेषित पौलानेही इफिस शहरातील ख्रिस्ती
मंडळीला खोटे शिक्षकांच्या उदयाबद्दल सावध केले आहे आणि प्रभू येशूच्या
ख्रिस्ताच्या शिकवणीला धरून राहण्यास सांगितले आहे; कोणा माणसांच्या बुद्धीवर आधारित रोमन कॅथॉलिक
शिकवणीवर नव्हे. (प्रेषितांचे कृत्ये २०:२८-३०, इफिस ४:१४-१५, कलस्सैकरांस पत्र २:४, ८-१० वाचा)
प्रेषितांचे कृत्ये २०:२८-३०
"मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे
तुम्हांमध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हांपैकी काही माणसे उठून
शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील."
इफीसकरांस पत्र ४:१४-१५
"ह्यासाठी कि, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धुर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गांस नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिक्वणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ
नका. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व
प्रकारे वागावे. "
कलस्सैकरांस पत्र २:४, ८-१०
"लाघवी भाषणाने कोणी तुम्हांस भुलवू नये म्हणून हे सांगतो; .....ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ
भूलथापा ह्यांच्या योगे तुम्हांला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या; कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान
वसते, आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे
त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहा."
प्रेषितांची
व पर्यायाने पोपची अचूकता
पवित्र शास्त्र आपल्याला हे सांगते की "फक्त
शास्त्र व देवाचे वचन हेच अचूक आहे; (मत्तय २४:३५ वाचा) आणि कोणत्याही ख्रिस्ती शिकवणीची तुलना ही फक्त
शास्त्राबरोबरच होते.” तसेच कोणीही मनुष्य अचूक नाही. (रोमकरांस पत्र ३:४ वाचा)
मत्तय २४:३५
"आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझे वचने नाहीशी होणारच
नाहीत."
रोमकरांस पत्र ३:४
"... देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो;"
मग तो प्रेषित असो वा पोप असो वा बिशप. मनुष्य
खोटा म्हणजेच त्याच्याबरोबर त्याने आपल्या कल्पनेवर उभारलेले त्याचे तर्क वितर्क हेही खोटे आहेत. म्हणूनच ही रोमन कॅथॉलिक शिकवण जी मनुष्यांच्या
विचारांवर आधारित आहे तीही खोटी आहे. (मत्तय ५:१८; स्तोत्र १९: ७-८ ; ११९: १६० ; नीतिसूत्रे ३० : ५; योहान १७:१७ , २ पेत्र १ : १९-२१ हे संदर्भ वाचा). बायबल कुठेही कोणतेही प्रेषित अचूक होते असे शिकवत नाही. ह्यावरून पोप साहेबांचे सर्व निर्णय अचूक
असल्याची समज आणि शिकवण ही फोल आहे.
ह्या सर्व वरील तत्वे, ज्याच्या आधारे रोमन कॅथॉलिक चर्च प्रेषित पेत्राला पहिला पोप म्हणून घोषित
करतात; ते सर्व फोल आणि निराधार आहेत, ज्याला शास्त्रात कोणताही आधार सापडत नाही.
म्हणजेच हे शिकवण ही देवापासून नाही तर मनुष्यांच्या तर्कशास्त्रावर आधारित आहे.
सत्य हे आहे की, रोमन कॅथॉलिक चर्च ने ही शिकवण आपल्या
स्वार्थासाठी म्हणजेच, ख्रिस्ती मंडळींवर आपला अधिकार प्रस्थापित
करण्यासाठी उभारलेली आहे, आणि दुर्दैवाने त्यात ते बहुतांशी सफलहि झाले
आहे. पण शास्त्र आपल्याला म्हणते की सत्य तुम्हांला समजेल आणि ते तुम्हांला
बंधमुक्त करील. तेच सत्य तुम्हा प्रत्येकांना ह्या शिकवणीपासून मुक्ती देवो. आमेन.
सारांश: होय, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटल्याप्रमाणे प्रेषित पेत्र
हा एक "खडक"
म्हणजे "Rock" होता. प्रेषित पेत्राची इतर प्रेषितांमध्ये एक नेतृत्वाची
भूमिका होती, आणि आरंभी सुवार्तेच्या प्रसारामध्ये पत्राने फार महत्त्वाची भूमिका पार पाडली. तथापि, हे वरील कोणतेही सत्य, 'पेत्र हा पहिल्या पोप होता' या संकल्पनेला दुजोरा देत नाहीत; किंबहुना प्रेषित्यांमध्ये तो "सर्वोच्च नेता " होता ह्याला किंवा त्याचा “हा अधिकार त्याने वारसाहक्काने रोमन बिशॉपच्या स्वाधीन केला” ह्याला कुठेही दुजोरा देत नाही.
त्याउलट प्रेषित पेत्र स्वतः आपल्या सर्वांना मंडीळीचा खरा
मेंढपाळ व संरक्षक जो प्रभू येशू ख्रिस्त ह्याकडे निर्धेशीत/बोट करतो. म्हणूनच ही
शिकवण रोमन कॅथॉलिक चर्च ने ही जी शिकवण आपल्या स्वार्थासाठी म्हणजेच, ख्रिस्ती मंडळींवर आपला अधिकार प्रस्थापित करण्यासाठी
उभारलेली आहे ती देवापासून नाही!! ख्रिस्ती मंडळींचा
मस्तक (मुख्य) प्रभू येशू ख्रिस्त असल्यामुळे, मंडळीसंदर्भात सर्व निर्णय घेण्याचा अधिकार केवळ त्यालाच आहे, कोणा अन्य मर्त्य मनुष्यास नाही; मग तो पोप असो वा बिशप किंवा धर्मगुरू .
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
Contact Details / संपर्क माहिती :
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
© 2016 - 2020 Digital सुवार्तिक All Rights Reserved
No comments:
Post a Comment